कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप सरकार सत्तेवर असताना कोल्हापूर जिल्हयातील एकही थेंब पाण्याचा अडवण्यात चंद्रकांत पाटलांना यश आलेले नाही. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते असूनही रस्त्यांची दयनीय अवस्था राहिली. ठेका देऊन अनेक रस्त्यांचीकामे अर्धवट राहिली. म्हणून त्यांच्या काळातील रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ते आज (शुक्रवार) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजकीय सूडबुध्दीने आमचे सरकार कोणतीही चौकशी करत नाही. कॅगने ताशेरे ओढल्यानेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील या योजनेत मिळालेल्या लोकसहभागाचे काय असे विचारत असले, तरी जलयुक्त शिवारच्या कामांत सरकारच्या दहा हजार कोटींवर डल्ला मारल्याचाही गंभीर आरोप होत आहेत. त्याचे काय, असा सवालही त्यांनी केला.

चंद्रकांत पाटलांकडे सार्वजनिक बांधकामसारखे महत्त्वाचे खाते होते. यामुळे त्यांनी राज्याचे राहू दे, आपल्या जिल्ह्यातील रस्ते तरी चांगले करण्याची अपेक्षा होती. पण अपेक्षाभंग झाला आहे. त्यांच्या काळात ठेका दिलेले निपाणी – राधानगरी, कोल्हापूर – गारगोटी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काही कामाचे ठेकेदार पळून गेले आहेत. म्हणून या कामांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ना. मुश्रीफ यांनी केली.