विकासकामांचा बॅकलॉग भरून काढणार : ना. हसन मुश्रीफ

0
143

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसली होती. मात्र, आता अर्थव्यवस्था वेग पकडत आहे. महिन्यात २३ हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच भरघोस निधी देऊन विकासकामांचा सर्व बॅकलॉग भरून काढणार, अशी ग्वाही ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ते आज (शुक्रवार) जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात पार पडलेल्या पत्रकार समीर देशपांडे लिखित ‘गाथा ग्रामविकासाची : कोल्हापूर जिल्हा परिषद आज, काल, उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

मुश्रीफ म्हणाले की, आगामी काळात विधानपरिषदेची निवडणूक आहे, तेव्हा निधीची चिंता करू नका. राज्याची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. जिल्हा नियोजन समितीला शंभर टक्के निधी दिला आहे. जिल्हा परिषद सदस्यांना दहा हजार रुपये मानधन वाढीचा अध्यादेशही लगेच काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की,  गावांच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनाही वित्त आयोगातील निधी मिळवून देत, या संस्था सक्षम केल्या जात आहेत.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे अधिकार संपुष्टात येत असल्याने नागरिकांना मंत्र्यांकडे जावे लागत आहे. रोज मोर्चा काढणारे गाव, अशी कोल्हापूरची ओळख निर्माण होत आहे, त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्याचा विचार तिन्ही मंत्र्यांनी करावा. सगळे अधिकार मंत्रालयात एकवटले जाऊ नयेत.

यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी व आमदार प्रकाश आबिटकर यांची भाषणे झाली.  मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते समीर देशपांडे व त्यांच्या पत्नी संजीवनी देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रास्ताविक, ‘अक्षर दालन’चे अमेय जोशी यांनी आभार मानले.