‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’..? : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली बेपत्ता

0
18658

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : बँकांचा राखीव निधी म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुकीत करून बँकांना जादा व्याज परताव्याचे आमिष दाखवत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हर्षद मेहता तुम्हाला आठवत असेल. असाच एक ‘हर्षद’ गडहिंग्लज अर्बन बँकेला भेटला असून त्याने बँकेची 13 कोटी रुपयांची गुंतवणूक ‘छू मंतर’ करीत गायब केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने यासाठी जनरल मॅनेजरला जबाबदार धरले असुन किरण तोडकर यांच्यावर बँकेच्या फसवणुकीचा आरोप करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण ‘त्या’ गुंतवणुकीचे काय..? याबाबत संचालक मंडळ चिंताग्रस्त आहे.

संचालकांच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बँकेच्या गुंतवणूक नियमांचे पालन करीत बँकेच्या निधीची गुंतवणूक करण्याचे अधिकार जनरल मॅनेजर तोडकर यांना होते. त्यांनी 2015 सालापासून रुपेश काळे नामक ब्रोकरच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू ठेवली होती. चार वर्षे त्याचा परतावा व्यवस्थित मिळत असल्याने सगळं आलबेल होतं. पण गेल्या आर्थिक वर्षात मात्र तोडकर यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करीत संचालक मंडळाला अंधारात ठेऊन डायरेक्ट रुपेश काळे या ब्रोकरच्या वैयक्तिक खात्यात ही गुंतवणुकीसाठीची रक्कम अदा केली. 17 एप्रिल 2020 रोजी तीन कोटी आणि नंतर सात वेळा टप्प्याटप्प्याने एकूण 13 कोटी रुपये देण्यात आले. वर्ष अखेरीस त्याचा परतावा न आल्याने संचालक मंडळाच्या फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नसला तरी तो लवकरचं करून दोषींवर कारवाई करण्यासाठी संचालक प्रयत्नशील आहेत.

सध्या सुमारे अडीचशे कोटींच्या ठेवी आणि जवळपास एकशे साठ कोटींची कर्जे असून 90 कोटी रुपयांची विविध प्रकारची गुंतवणूक आहे. शिवाय 3 कोटी 39 लाखांचा ढोबळ नफा असून बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. ही फसवणूक झालेली रक्कम राखीव निधी वर्गातील असल्याने त्याचा बँकेच्या आर्थिक क्षमतेवर सरळ परिणाम होणारा नाही, त्यामुळे सभासदांनी याबाबत निश्चित राहावे असे आवाहन संचालकांनी केले आहे.

मात्र ‘त्या’ गुंतवणुकीचे पुढे काय? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.