कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचगाव (ता. करवीर) येथील गणेश चौकातील हॉटेल मुजावरसमोर एकाला कोयत्याचे वार करून जखमी करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजारांचा दंड तर दुसऱ्यास तीन महिने सक्तमजुरी आणि दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावासाची सजा सुनावली आहे. निखिल कुशकुमार इंडी (वय २०), कुणाल कुशकुमार (वय १९) अशी या आरोपींची नावे आहेत.

उचगाव येथे गणेश चौकात ८ मार्च २०१३ रोजी विकास सुरेश सुतार आणि आरोपींमध्ये भांडण सुरू असताना विकासचे वडील सुरेश सुतार यांनी घटनास्थळी जाऊन समजूत काढत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र निखिल कुशकुमार याने सुरेश सुतार यांच्यावर कोयत्याने पाठीत, कंबरेवर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कुणाल कुशकुमार याने सुरेशच्या डोक्यात दगडाने प्रहार केले. श्रीमती माधवी कुशकुमार यांनीही सुरेशाला शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुरेश सुतार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती.

सरकारी वकील समीर तांबेकर यांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी निखिल कुशकुमारला पाच वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड, कुणाल कुशकुमार याला तीन महिने सक्तमजुरीची, दंड न भरल्यास १ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली.