कोल्हापूर (प्रतिनिधी) : लग्नासाठी नकार दिल्याने महिलेच्या घराच्या परिसरात तसेच घरी जाऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आज पदवीधर संघटनेच्या राज्य उपाध्यक्षास करवीर पोलिसांनी अटक केली. आनंदराव ज्ञानदेव नाईक (वय ४५, रा. बापूरामनगर, कळंबा) असे त्याचे नाव आहे. याबाबत जिवबा नाना पार्क परिसरात इंगवले कॉलनीत राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक याच्याशी लग्न करण्यास फिर्यादी महिलेने नकार दिला होता. त्यामुळे संशयित नाईक हा २०१७ पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देत होता. २५ सप्टेंबर २०२० रोजी महिला दुध आणण्यासाठी घराच्या परिसरातील दुकानात गेली असता तिथे तिचा त्याने विनयभंग केला. ती महिला तेथून पळून गेली असता पाठलाग करून तो तिच्या घरी गेला. घरी जाऊन त्याने लग्न न केल्यास तुझी आणि तुझ्या मुलीची बदनामी करीन, अशी धमकी दिली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तिच्या जावयास फोन करून त्याला  संबंधित महिला आणि तिची मुलगी यांच्याबद्दल बदनामीकारक गोष्टी सांगितल्या. यामुळे या महिलेने १० फेब्रुवारी २०२१ रोजी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबद्दल त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आनंदराव नाईक याला आज त्याच्या घरातून करवीर पोलिसांनी अटक केली.