मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या जादुई आवाजाने भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महान गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या गाण्यांच्या अवीट सुरावटी कित्येक वर्षांपासून श्रोत्यांच्या मनात  रूंजी घालत आहेत. केवळ एकाच प्रकारच्या गायकीत अडकून न पडता गाण्यांचे वेगवेगळे प्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्या गाण्यांचा आणि आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा आढावा…

आशाताईंनी १९४३ मध्ये आपल्या गायनाला प्रारंभ केला. तेव्हापासून ते आतापर्यत आशाताई गात आहेत. जगातील विविध देशांमध्ये त्यांचे चाहते आहेत.  आशाताईंनी संगीतातील वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मुशाफिरी केली. त्यात भावगीतं,  प्रेमगीतं, विरहगीत,  कवाली, गझल, लावणी, लोकगीतं यासारख्या अनेक प्रकारांमधून त्यांनी  श्रोत्यांचे कान तृप्त केले. आशाताईंनी आतापर्यत मराठीसह २० भाषांमधून १२ हजाराहून गाणी गायली आहेत.

सांगली शहरात त्यांचा ८ सप्टेंबर १९३३ साली जन्म झाला. त्यांचे मूळ नाव आशा मंगेशकर. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी चला चला नवबाळा नावाचं गाणं गायलं होतं. तर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी १९४९ मध्ये ‘रात की राणी’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे गाणी गायली होती. १९६० ते १९७० च्या दशकांत    बॉलीवूडमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. १९८० मध्ये आर. डी. बर्मन यांच्याशी त्यांनी लग्न केले.

मोहम्मद रफी यांच्यासोबत  गायलेल्या नन्हे मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है, गाण्यातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आशाजी यांनी पुढे एस. डी. बर्मन,  आर. डी. बर्मन यांच्यासोबत काम केले.  त्यांनी ‘माई’ नावाच्या मराठी चित्रपटामध्ये भूमिका केली होती. २०११ मध्ये आशा भोसले यांच्या नावाचा गिनिज बूक ऑफ वर्ल्ड मध्ये समावेश झाला होता.  २००० मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने   गौरवले. तर  २००८ मध्ये त्यांना पद्मविभुषण पुरस्काराने सन्मानित केले.