कोल्हापूर (प्रतिनिधी) : हणबरवाडी (ता. करवीर)  येथील श्वेता धनाजी वाडकर या बाळंतिणीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे सर्व नातेवाईक आणि गावकर्‍यानी सीपीआर हॉस्पिटलमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत  डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत  मृतदेह  ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकरी आणि नातेवाईक यांनी घेतला.

श्वेता वाडकर यांना बाळंतपणासाठी इस्पूर्ली (ता. करवीर)  येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गुरूवारी सकाळी दाखल करण्यात आले होते.  काल संध्याकाळी जन्मजात बाळाचा मृत्यू झाला आणि रात्री अचानकपणे महिलेची प्रकृती खालावल्यामुळे तिचाही मृत्यू झाला. उपचार करतेवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना याबाबत काहीही न सांगता अचानक रात्री १०८ या रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये बाळंतणीला पाठवले. पण सदरची रुग्ण मयत झालेली असल्यामुळे सीपीआरमधील डॉक्टरांनी ऍडमिट करून घेण्यास मनाई केली. ही बाब नातेवाईकांना कळताच सर्व नातेवाईकानी बाळाच्या आणि बाळंतिणीच्या मृत्यूला स्वतः डॉक्टर जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जोपर्यत गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा  आक्रमक पवित्रा घेतला. इस्पूर्ली येथील खासगी रूग्णालयातील संबंधित डॉक्टर जिल्हा परिषदमध्ये नोकरीला असल्याचे समजते. यापूर्वीही या रूग्णालयात अशी अनेक प्रकरणे घडल्याचे  नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, करवीरचे पोलीस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांनी सीपीआर रूग्णालयात येऊन ग्रामस्थ आणि नातेवाईकांची भेट घेतली.