कोल्हापूर (प्रतिनिधी) :  हॉलमार्किंग सिस्टिम आणि एचयूआईडीमुळे सराफ व्यवसाय उदध्वस्त होणार आहे. याबाबत दिल्ली येथे नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. यामध्ये हॉलमार्किंग आणि एचयूआईडीला विरोध करण्यात आला. या बैठकीमध्ये देशभरातील विविध संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे ५५ सदस्य उपस्थित होते.

या बैठकीमध्ये, एचयूआईडी सराफ व्यवसायासाठी स्विकारता येणार नाही. कारण यामुळे उद्योगाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्वच सदस्यांनी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र ५ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सराफ व सुवर्णकार महामंडळाचे विभागीय अध्यक्ष भरत ओसवाल यांनी येथील लाखी मण्यांना हॉलमार्क लागू करण्याला विरोध केला.

भरत ओसवाल म्हणाले की, जून २०२१ पासून केंद्र सरकारने सोन्यांच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क सक्तीचे केले आहे. यामध्ये लाखी मण्यांनाही हॉलमार्क सक्तीचे केले आहे. मात्र, लाखी मणी हे प्रामुख्याने लाखी स्वरूपाचा असतो. या मण्याचे सोने खरेदी करण्यापासून मणी तयार होण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या व्यवसायात मशीनरी चालत नसल्याने हातावरच याचे काम चालते. कोल्हापूरचा विचार केला तर यावर सुमारे १५ हजार कुटुंबे अवलंबून आहेत. याला हॉलमार्क आणि एचयूडीच्या सक्तीमुळे पूर्ण व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखी मण्यांना हॉलमार्कमधून सूट मिळावी. याला समितीच्या सर्वच सदस्यांनी समर्थन देऊन सरकारशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे सांगितले.

या बैठकीला दिनेश जैन, फत्तेचंद रांका,योगेश सिंघल, महेश जैन, मुथू वेंकटरमण,कोयंबटूर समर डे,प्रकाश कागरेचा,राजेश रोकडे, सुधाकर टाक, प्रीतम ओसवाल, आदी प्रतिनिधी उपस्थित होते.