गटर, कचराप्रश्नी नगरसेवकांना महापालिकेत का यावे लागते ? : आ. चंद्रकांत जाधव

आरोग्य घनकचरा विभागाच्या आढावा बैठकीत विविध सूचना

0
72

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘समृध्द कोल्हापूर’च्या निर्माणसाठी महापालिकेचा आरोग्य घनकचरा विभाग सक्षम पाहिजे. तुंबलेली गटर व साचलेला कचरा या प्रश्नावर नगरसेवकांना महापालिकेत का यावे लागते, असा सवाल आ. चंद्रकांत जाधव यांनी केला. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने कामाचे सूक्ष्म नियोजन केल्यास आपले कोल्हापूर कायमस्वरूपी ‘स्वच्छ व सुंदर’ राहील असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. आज (सोमवार) महापालिकेत घेतलेल्या आरोग्य घनकचरा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रभागनिहाय स्वच्छतेबाबतची माहिती घेत आ. जाधव यांनी आरोग्य निरीक्षक व मुकादम यांच्याशी संवाद साधला. अनेक सफाई कर्मचारी वयोवृद्ध झालेत, त्यांना कामे जमत नाहीत. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरातील व्यक्तींना संधी द्या. जे कर्मचारी जबाबदारीने काम करत नाहीत त्यांना समज द्या. जे कर्मचारी बदली कामगार कामावर पाठवतात, त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.

प्रभागातील कचरा संकलनाचे काम १०० टक्के यशस्वतीरित्या पार पाडल्यास कचऱ्याची समस्या राहणार नाही. ड्रेनेज तुंबून, पाणी रस्त्यावर आल्याची तक्रार आल्यानंतर, सफाई कर्मचारी तेथे जातो. हे योग्य नाही. वारंवार चोकअप होणाऱ्या ड्रेनेजची पाहणी करुन, ते चोकअप होण्यापूर्वी मशिनने स्वच्छ करून घ्यावे. ड्रेनेज स्वच्छतेसाठी मशिनरीची आवश्यकता असल्यास, त्याचा प्रस्ताव द्या. शासनाकडून निधी आणू अशी ग्वाही देऊन कत्तलखाना विभागाने लोकांना विश्वासात घेऊन काम करावे, या विभागातून उत्पन्न वाढले पाहिजे अशी अपेक्षा आमदार जाधव यांनी व्यक्त केली.

पंचगंगा स्मशानभूमी नूतनीकरणाचा व जनावरांच्या दहन वाहिकेचा प्रस्ताव द्यावा. योग्य नियोजन व व्यवस्थापनातून मार्केटमध्ये कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, याची दक्षता घनकचरा विभागाने घ्यावी तसेच व्यावसायिकांनाही कचरा टाकण्याबाबत आचारसंहिता घालून द्यावी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली. परिसरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. तसेच प्लॅस्टिक बंदीचा नागरिकाबरोबर प्रशासनाला विसर पडला आहे का ? कोल्हापूरचे एक थेंबही सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळायला नको, त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेती, बागांना देण्याबाबतचा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करा. हा प्रस्ताव मंजूर करून आणण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले.

यावेळी सहाय्यक आयुक्त संदीप घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, आरोग्य निरीक्षक व मुकादम उपस्थित होते.