कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर मेन रोडवर गणेश चित्र मंदिरासमोर असलेल्या पूजा पान शॉप आणि चिंचवाड रेल्वे फाटकानजीक मामू पान शॉपमध्ये पंधराशे रुपयांचा गुटका अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून जप्त केला.

आसिफ मुनीर कुरणे (वय २९, रा. यादवनगर, कोल्हापूर) यांचे मामू पान शॉप असून अशोक कवडामल पंजवानी (वय ६५, रा. शिरू चौक, गांधीनगर) यांचे पूजा पान शॉप आहे. या दोघांकडे गुटका मिळून आल्याने त्यांच्यावर अन्न औषधे व मानदे कायद्याचा भंग केल्याबद्दल गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अन्न औषध व सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिंचवाड रोडवरील शांतीनगर येथील गुटख्यासाठी कुख्यात असलेल्या किराणा मालाच्या दुकानात कारवाई होत असल्याचे काही जणांनी पाहिले. तिथे मोठ्या प्रमाणात असलेला गुटका ताब्यात घेतल्याची माहिती काही नागरिकाना मिळाली. पण संबंधिताला अभय का देण्यात आले, असा सवाल संपूर्ण गांधीनगरमध्ये नागरिक उपस्थित करत होते.