उंड्री येथील शाळेत गुरूजींनीच केली ओली पार्टी    

0
602

कोतोली प्रतिनिधी (प्रतिनिधी) :  कोरोनामुळे मागील १० महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढू लागली आहे. परंतु प्रदीर्घ सुट्टी घेतलेले शिक्षक मात्र, सुट्टीच्या हँगओव्हरमध्येच असल्याचे चित्र  पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे पाहायला मिळाले. शाळेत हजर झालेल्या शिक्षकांनी  सुट्टीचा शीण घालविण्यासाठी मुख्याध्यापकासोबतच ओली पार्टी केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिक्षकांनी शाळेतच मांसाहारी जेवणाचा बेत केल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांची पार्टी उधळून लावली. शिक्षक तांबड्या रस्यावर ताव मारत मांसाहारी पार्टीचा आस्वाद घेत  होते. यावेळी अचानक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी शाळेत हजर झाल्याचे समजताच सर्वांची मात्र एकच भांबेरी उडाली. काही शिक्षक शाळेच्या आवारात धावत बाहेर आले. तर काहींनी स्वत:ला खोलीतच बंद करून घेणे पसंद केले. तर शालेय पोषण आहार बनविणार्‍या महिलांची रस्याचे पातेले व मटणाचे डबे व इतर साहित्य दडवण्यासाठी एकच धांदल उडाली.