कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने सोमवार २२ रोजी मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० कामगार सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी बंद करून ऑफलाइन पद्धत सुरू करावी, स्वतंत्र जीवनदायी (मेडिक्लेम) योजना पूर्ववत सुरू करावी, साहित्य खरेदीसाठी ५ हजार रुपये अनुदान योजना, स्वतंत्र घरकुल योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असून कामगार कोल्हापुरातून रविवारी सायंकाळी मुंबईला रवाना होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून राज्यातील ४ ते ५ हजार कामगार या मोर्चात सहभागी होणार आहेत. या आक्रोश मोर्चात सहभागी होणार असून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा मंत्रालयावर निघणारच अशा इशाराही त्यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष प्रदीप मस्के, जिल्हा संघटक अशोक कांबळे, कृष्णात लोखंडे उपस्थित होते.