गुलाबरावांनी एका दिवसात ‘देव’ बदलला?

0
193

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मोठे बंड करुन शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकले आहे. थोडे-थोडके नव्हे तर ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. गुलाबराव पाटील फक्त गुवाहटीलाच गेले नाही तर तेथील हॉटेलमध्येच पोहचताच ते चक्क एकनाथ शिंदे यांच्याच पाया पडले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या कृतीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

शिवसेनेने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मंत्रिपदापर्यंत पोहोचवले आहे. सत्तेतील अनेक मोठी पदे दिले आहेत. अशापैकीच जळगावचे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री असलेले गुलाबराव पाटील आहेत.

गुलाबराव पाटील यांची खरी ओळख म्हणजे कट्टर शिवसैनिक अशी आहे. अगदी सामान्य शिवसैनिक असलेले गुलाबराव पाटील यांना दोन्ही टर्ममध्ये उद्धव ठाकरे यांनी मंत्री केले होते. त्यामुळे गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक असल्याचे बोलले जात होते; मात्र याच गुलाबराव पाटलांनी एका दिवसात आपला ‘देव’ बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यापूर्वी उद्धव ठाकरेंवर कोणीही टीका केली तर त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी गुलाबराव पाटील हे कायम सज्ज असायचे. अगदी ते राणेंनाही शिंगावर घ्यायचे. त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड घडवून आणले तेव्हा गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अशी शिवसेनेतील अनेक नेत्यांची खात्री होती.

कधी काळी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे गुलाबराव हे राजकीय हवा बदलताच अशा पद्धतीने बदलल्याने त्यांच्याबाबत आता प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुलाबराव यांनी एका दिवसात आपला देव कसा काय बदलला? अशी विचारणा अनेक सामान्य शिवसैनिकांतून होत आहे.