टोप (प्रतिनिधी) : कासारवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे उद्देशाने रब्बी ज्वारी पीक उत्पादन आणि तंत्रज्ञान या विषयावर कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

विभागीय विस्तार केंद्राचे डॉ. अशोक पिसाळ यांनी ज्वारी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन व बदलत्या हवामानानुसार ज्वारीचे नियोजन कसे करावे. याबद्दल मार्गदर्शन केले. शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विलास करडे यांनी जैविक शेती, सेंद्रिय शेती या विषयासह ऊस पिकामध्ये सेंद्रिय पद्धतीचे व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी ज्वारी पिकाचे नियोजन करून शेतातील खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवावा, असे आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव माने शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विजयसिंह माने होते. यावेळी कासारवाडीच्या सरपंच शोभाताई खोत, टोप सरपंच रूपाली तावडे, संभापूर सरपंच प्रकाश झिरंगे, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अभिजीत घोरपडे, कृषी सहाय्यक एम.एन. जाधव यांच्यासह टोप, संभापूर, कासारवाडी गावचे उपसरपंच, ग्रा.सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी मित्र आदीसह शेतकरी उपस्थित होते.