इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा पोलिस दल अंतर्गत इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण कक्ष आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांचे पालन या विषयावर कार्यक्रम आज (शनिवार) रोटरी क्लब येथे संपन्न झाला. अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी याबाबत मार्गदर्शन केले.

जयश्री गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नाही. वाहन परवाना, हेल्मेट आणि वाहनांची वेग मर्यादेकडे होणारे दुर्लक्ष अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले. याकडे सर्वांनी जागरुकपणे लक्ष दिल्यास वाढत्या अपघातावर नियंत्रण आणणे शक्य होण्याबरोबरच वाहतुकीला चांगली शिस्त लागेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्वानी वाहतूक नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

पोलिस उपाधिक्षक बी.बी.महामुनी, गावभाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय यळरुटे, प्रोजेक्ट चेअरमन प्रकाश रावळ, वसंत पाटील, डॉ. जे.एम.पाटील, सत्यनारायण धूत, धनाजी मोरे, बजरंग लोणारी, राजू आरगे आदी उपस्थित होते.