कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) कोल्हापूरातील कसबा बावडा, शिये पूलासह रमणमळा परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी आ. ऋतुराज पाटील आणि आ. चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. यामुळे कसबा बावडा येथील टोल नाका, बावडा-शिये पूल, रमणमळा येथील १०० फुटी रोड परिसरातील शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासर्व भागांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, नदीकाठच्या शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी नाले आहेत त्यांचे सर्व्हे करणे. तसेच त्यांची गरज भासल्यास रुंदी वाढण्याबाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना सूचना दिल्या.

तसेच सरसकट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांना सूचित केले. याबरोबर  बावड्यातील सर्व पाणंद रस्ते पक्के करण्याबाबत त्या-त्या भागातील शेतकऱ्यांची व्यापक बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या.

यावेळी प्रातांधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल भामरे-मुळे, श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, संचालक, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अशोक जाधव, मोहन सालपे, श्रावण फडतारे, शेतकरी उपस्थित होते.