पालकमंत्र्यांचे ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तनाचे स्वप्न भंगणार : शौमिका महाडिक

0
1901

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) कारभार आमदार पी. एन. पाटील,  ज्येष्ठ संचालक  अरूण  नरके आणि  माजी आमदार  महादेवराव महाडिक यांनी शेतकरी हिताचा केला आहे. त्यामुळे  दूध उत्पादकांचा सत्ताधाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच गोकुळमध्ये सत्ता परिवर्तनाचे पालकमंत्र्यांचे  स्वप्न भंगणार आहे, असा टोला  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी लगावला .

शौमिका महाडिक यांनी आज (गुरूवार)  गोकुळ निवडणुकीसाठी प्रांत कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  गोकुळच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दुपारच्या सत्रातील भेटीगाठी सुरू ठेवले आहेत. हाच धागा पकडत पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांची दुपारची झोप उडाली आहे, असा टोला महाडिक यांचे नाव न घेता लगावला होता. याचा शौमिका महाडिक यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला.

त्या म्हणाल्या की, आमची दुपारची झोप उडाली नसून त्यांना रात्रीची झोपही लागेना झाली आहे. गोकुळच्या सत्तेचे स्वप्न  त्यांना अस्वस्थ करून टाकत आहे. ते गेले १० वर्षे महाडिक यांच्यासोबत होते. त्यामुळे आप्पांच्या सवयी त्यांना चांगल्याच माहीत आहेत.