कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाढती लोकसंख्या आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, ही गावपातळीवर एक  मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ‘सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प’ उभारण्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा. ही योजना मंजूर असलेल्या गावांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे  प्रकल्प आराखडा तात्काळ सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. आज (शनिवार) पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

ना. पाटील म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ग्रामपंचायतींना सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी दीड कोटी रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज स्वरुपात निधी देण्यात  येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ गावांमधे हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी आपल्या गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, ज्या ग्रामपंचायतींना प्रकल्प आराखड्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी मंजूर आहे, त्यांनी दूषण नियंत्रण मंडळाकडे तात्काळ प्रकल्प आराखडा सादर करावा व हा प्रकल्प राबवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड म्हणाले की, गांधीनगर, गडमुडशिंगी आणि वळीवडे या तिन्ही गावामध्ये एक एसटीपी प्रकल्प तर उंचगाव मध्ये स्वतंत्र तसेच कळंबा आणि पाचगाव या गावांसाठी एक एसटीपी प्रकल्प त्याचबरोबर चंदूर आणि कबनूर या गावांसाठी एक एसटीपी आणि तळदगे गावात स्वतंत्र एसटीपी उभारण्याचे नियोजित आहे.

बैठकीत सर्व गावांनी स्वतंत्र आराखडे तयार करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. तारदाळ, खोतवाडी, यड्राव आणि कोरोची ही गावे देखील प्रस्तावित करण्यात आली आहेत. या वेळी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, ‘प्रदूषण नियंत्रण’चे  प्रादेशिक अधिकारी रवी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, बैठकीला करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्रियदर्शिनी मोरे, अरुण जाधव, मनीष पवार, तहसीलदार, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, गटविकास अधिकारी उपस्थित होते.