कोल्हापूर (प्रतिनिधी) : जर आम्ही खरंच भ्रष्टाचार केला असेल तर पालकमंत्र्यांनी सरळ केस दाखल करावी, फुकटच्या तोंडी वाफा दवडू नयेत असे प्रत्युतर गोकुळ संचालक आणि माजी जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिले आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी हे उत्तर दिले आहे.

पत्रकामध्ये म्हणले आहे की, आज गोकुळच्या कार्यालयामध्ये सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. नेहमी अर्धसत्य सांगून दिशाभूल करण्याची सवय पालकमंत्र्यांना आहे. ती दिशाभूल होऊ नये यासाठी कोणीतरी समोर येऊन पूर्ण सत्यही सांगितलं पाहिजे, म्हणून हा खुलासा करत आहे.

पालकमंत्री आणि मुश्रीफ साहेब म्हणतात, संघात आजपर्यंत हुकूमशाही कारभार होता. मला त्यांना विचारायचं आहे की, जर हुकूमशाही कारभार असता तर आज पहिल्याच पत्रकार परिषदेत सोबत घेऊन यायला तो कागद तरी त्यांच्या हातात असता का? आज तो कागद, सर्व बिलांची माहिती या गोष्टी त्यांच्याकडे आहेत कारण आम्हाला कधीच या गोष्टी लपवण्याची गरज पडली नाही. जे आहे ते समोर आहे स्पष्ट आहे, पारदर्शी आहे. सेवा दिली, बिलं घेतली. व्यवसाय व्यवसायाच्या जागीच ठेवला. हुकूमशाही कारभार म्हणजे काय असतो हे बघायचंच असेल तर त्यांनी स्वतःच्या ताब्यातल्या गगन बावड्याचा कारखान्यात डोकावून बघावं. ज्याचा अहवाल कधी समोर येत नाही, रातोरात कारखान्याच नाव बदललं जातं आणि निवडणूका तर कधी येऊन जातात हे कळतसुद्धा नाही.

नेहमी टँकर आणि या ईतर गोष्टींचं तुणतुणं वाजवणाऱ्या पालकमंत्र्यांना आज मला सांगायचं आहे की, महाडिकांनी सेवा देऊन बिलं घेतली. आणि यात जर काही खोटं असेल. भ्रष्टाचार असेल तर आज ते गृहराज्यमंत्री आहेत. रोज उठून मिडियासमोर बोलण्यापेक्षा जाऊन वेट कंपनीवर केस दाखल करावी. आमची पूर्ण तयारी आहे सामोरं जाण्याची विद्यमान चेअरमन साहेबांनीसुद्धा येऊन सांगावं, यात काय भ्रष्टाचार आहे? अजून कोणाचे किती टैंकर आहेत? एकदा सगळाच खुलासा त्यांनी करावा.

ज्यांचे स्वतःचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत त्यांनी सरळमार्गाने जाणाऱ्यांना डिवचण्याच्या भानगडीत पडू नये. शेतकऱ्यांना २ रुपये वाढवून देण्यासाठी यांचं सगळं नियोजन तयार होतं तर आता उशीर का लागतोय हे सांगावं. त्या महापालिकेचा घरफाळा अजून भरला नसेल तर तो भरून घ्यावा. शिक्षणाच्या नावाखाली पालकांना लुबाडणं थांबवावे. आणि वेळ उरलाच तर आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःची हजारो कोटींची संपत्ती कशी उभी राहिली याचं नैतिकतेच्या मूल्यांवर त्यांनी आत्मपरीक्षण करावं अशी टीकाही शौमिका महाडिक यांनी केली आहे.