पालकमंत्र्यांनी ११ फेब्रुवारीला ट्रॅकचे उद्घाटन करावे अन्यथा..! : विलास गाताडे

0
120

इचलकरंजी (प्रतिनिधी) : तारदाळ येथील वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅकचे १० फेब्रुवारीपर्यंत परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आ. प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात यावे. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी या ट्रॅकचे श्रीफळ वाढवून आ. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सामुदायिक उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅण्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष विलास गाताडे, इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, इचलकरंजी शहरासह हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांची ओढाताण होते. यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅण्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या वतीने संस्थेच्या जागेत स्वखर्चाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधून देण्यात आला आहे. या ट्रॅकचे उद्घाटन करुन तो प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ताब्यात देण्यासंदर्भात आ. आवाडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, पालकमंत्र्यांकडून त्यासाठी तारीख आणि वेळ दिली जात नाही. हा ट्रॅक तयार असून केवळ उद्घाटन न झाल्याने तेथे कामकाज सुरु झालेले नाही.

ट्रॅक तयार असतानाही पासिंगसाठी वाहनधारकांना मोरेवाडी-कोल्हापूर येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. म्हणूनच पालकमंत्र्यांनी या ट्रॅकचे १० फेब्रुवारीपर्यंत उद्घाटन करुन हा ट्रॅक लोकार्पण करावा. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी आ. प्रकाश आवाडे हे सर्व वाहनधारकांना घेऊन सामुदायिकपणे ट्रॅकचे उद्घाटन करतील, असे दत्तवाडे आणि गाताडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.