गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील गटाने चांगली कामगिरी करत अनेक ठिकाणी उमेदवार निवडून आणले आहेत. ४५ पैकी किमान १० ग्रामपंचायतीच्या  सरपंच आणि उपसरपंचपदी बंटी पाटील गटाचे उमेदवार निवडून येतील, असा दावा बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे आणि भुदरगड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव देसाई यांनी केला आहे. 

पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. हे ग्रा.पं.च्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. अनेक ठिकाणी स्थानिक आघाडीतून काँग्रेसचे तरुण उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम पक्षीय पातळीवरून ना. पाटील यांनी केल्यामुळे हे यश मिळाल्याचे सचिन घोरपडे यांनी सांगितले.

शामराव देसाई म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत भुदरगड तालुक्यात काँग्रेस पक्षाची वाढलेली ताकद दिसून आली. पाटगांव ग्रा. पं.मध्ये काँग्रेसचे ५ उमेदवार तर राष्ट्रवादी़चे ४ उमेदवार आहेत. येथे सरपंचपदासाठी महेश पिळणकर यांच्या नावांवर एकमत होणार आहे. बेगवडे येथे काँग्रेसच्या बाळू बुवा यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. कलनाकवाडीतही प्रताप वारके, शरद निंबाळकर यांच्या माध्यमातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. आदमापूर गंगापूर येथेही काँग्रेस गटाने स्थानिक युती करुन विजय मिळवला आहे. नाधवडे येथेही राष्ट्रवादीसोबत काँग्रेस विजयी झाली आहे. पळशिवणे, सालपेवाडी, गडबिद्री येथेही काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.

या पुढील काळात एस.एम.पाटील, बाळू बुवा, बाबूल, प्रकाश देसाई, भुजंगराव मगदूम, सुरेशराव नाईक, शंकर ग़ुरव, अशा मातब्बर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तालुक्यात काँग्रेस आणखी बळकट करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.