पुणे (प्रतिनिधी) :  पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. या सर्व प्रतिनिधींचे पुण्याचे पालक मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वागत केले आहे. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते. यावेळी त्यांनी जी-२० परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरियटमधील बैठकीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी काही स्टॉलना भेट दिली.

भारतीय पारंपरिक उत्पादने आणि महाराष्ट्रातील पर्यंटनस्थळांतही त्यांनी रुची दाखवली. मराठमोळ्या स्वागताचे त्यांना अप्रूप वाटले. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, खादी ग्रामोद्योग, तृणधान्य, बांबू उत्पादने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, केंद्र सरकारी आदिवासी सहकारी पणन विकास महासंघ, पुणे महानगर पालिकेच्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आदी प्रदर्शन दालनांना परदेशी पाहुण्यांनी कुतुहलानं भेट दिली. बांबू उत्पादनं आणि हस्तकलेच्या वस्तूंमध्ये रुची दाखवून आस्थेनं त्यांनी माहितीही घेतली.

तृणधान्यापासून बनवलेली उत्पादनं आमच्या देशांत उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करा, असे काही स्टॉलधारकांना जी-२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सांगितले. जी – २०’ मधील ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी बाजरीच्या तृणधान्यापासून तयार केलेल्या चिप्सची चव घेऊन वाहवा केली. ‘नमस्ते महाराष्ट्र’ म्हणत या वेळी पाहुण्यांचे पुणेरी आतिथ्य आणि मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

जी २० बैठक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत परदेशी पाहुण्यांनी धरला लेझीम ठेका

‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-२० प्रतिनिधींसाठीं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिववंदनेने सर्वच मंत्रमुग्ध झाले. जी २० परिषद कार्यकारी गटाच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांचे पुण्यनगरीत आगमन झाले असून पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.