आजरा (प्रतिनिधी) :  अतिवृष्टीमुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीला पूर आला होता. यावेळी नदीतील वाळू,  दरड आणि  गोटे शेतांमध्ये आल्याने नदीकाठावरील भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागांची पाहणी आज (रविवार) पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

आजरा तालुक्यातीस पेरणोली, साळगाव, चांदेवाडी, हाजगोळी, पेद्रेवाडी, गजरगाव, निंगुडगे, सरोळी, बोलकेवाडी आणि हत्तिवडे या ठिकाणी हिरण्यकेशी नदी काठावरील भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिरण्यकेशीला आलेल्या पुरामुळे साळगांव गावातील प्राथमिक शाळेचे शालेय साहित्यांचे नुकसान झाले आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारींचेही नुकसान झाले आहे.

तसेच गजरगावातील ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरत लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर आराखडा करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच सर्व पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी राज्यसरकार भक्कमपणे उभे असून त्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

यावेळी आ. राजेश पाटील, जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, विजय देवणे, सुनील शिंत्रे, उमेश आपटे, आजरा नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, आजरा सभापती उदय पोवार, अंजना रेडेकर, विध्याधर गुरबे, आजरा साखर कारखानाचे व्हा.चेअरमन आनंदराव कुलकर्णीं, सुभाष दोरुगडे आदी उपस्थित होते.