कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जीएसटी कायद्यातील त्रुटी व समस्यांचे निवारण करून जीएसटी कायदा सुटसुटीत करावा. अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त विद्याधर थेटे यांना देण्यात आले. तसेच जीएसटी कायद्यातील समस्याबाबतऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नवी दिल्ली यांनी सुरू केलेल्या इंटीमेशन ऑफ ऑल इंडिया प्रोटेस्ट मोहिममध्ये सहभाग घेण्यात आला.

निवेदनात म्हटलं आहे की, देशात जीएसटी कायदा लागू झाल्यापासून याच्या कायद्यामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. याचा थेट परिणाम उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट नाकारणे, जीएसटी रिटर्न्सची पुनरावृत्ती करण्यास परवानगी नसणे, अवेळी अधिसूचना जारी होणे, नोंदणी रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांना अतिरीक्त अधिकार आणि आयटीसी अवरोधित करणे, पोर्टल इश्यू, प्राप्तिकर उपयोगिता वेळेवर उपलब्ध करुन न देणे आणि वारंवार बदलणे,एमसीए जारी करणे.यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक आणि मानसिक ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे जीएसटी कायद्यातील त्रुटी व समस्यांचे निवारण करून जीएसटी कायदा सुटसुटीत करावा.

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, संचालक अजित कोठारी, दिपेश गुंदेशा, अभिराम दिक्षीत, गंगाधर हळदीकर, महेश जगताप तसेच केंद्रीय जीएसटी विभाग कोल्हापूरचे सहआयुक्त राहूल गावंडे उपस्थित होते.