कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील जुना राजवाडा भवानी मंडप येथे ५ डिसेंबर १८५७ रोजी झालेल्या रक्तरंजित रणसंग्रामातील क्रांतिवीरांना आज (रविवार) अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने  राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या क्रांतिवीरांना अभिवादन केले.

५ डिसेंबर १८५७ रोजी जुना राजवाडा येथे छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली सेनापती फिरंगोजी शिंदे सेनेचा इंग्रजांशी रक्तरंजित रणसंग्राम झाला होता. यामध्ये शेकडो शुरवीर धारातीर्थ पडले. या रक्तरंजित धगधगत्या रणसंग्रामाला साद घालण्यासाठी आणि तरुण पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळावी. यासाठी दरवर्षी मराठा महासंघाच्या वतीने जुना राजवाडा भवानी मंडप येथे ५ डिसेंबरला दीपप्रज्वलन करून क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात येते. यावेळी विविध मान्यवरांनी १८५७ च्या शौर्याचा आढावा घेवून रणसंग्रामाची माहिती दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, छत्रपती चिमासाहेब महाराज की जय, सेनापती फिरंगोजी शिंदे की जय अशा घोषणानाही देण्यात आल्या.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बबनराव राणगे, कादर मलबारी, संभाजीराव जगदाळे, अवधूत पाटील, शंकरराव शेळके, वैभवराव राजेभोसले, अनंत म्हाळुंगेकर, बाळासाहेब मोमीन, रणजित आयरेकर, शैलजा भोसले, विद्याताई साळोखे, संयोगीता देसाई आदी उपस्थित होते.