कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुखांनी आपल्या लिखाणाने आणि वक्तव्याने मराठी माणसाला जागे केले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर विखुरलेला मराठी माणूस ताठ मानेने, स्वाभिमानाने जगू लागला. शिवसेनाप्रमुखांचे विचार प्रेरणादायी असून त्याचे अनुकरण समस्त नागरिकांनी करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवार) बोलत होते.

यावेळी शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना शहर कार्यालय येथे शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना शहर कार्यकारणी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती व्यंगचित्रकार म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यात होती. तीच शक्ती त्यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले, दीपक गौड, जयवंत हारुगले, सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, तुकाराम साळोखे, सुनील खोत, रणजीत जाधव, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, धनाजी कारंडे, विभागप्रमुख अश्विन शेळके, निलेश हंकारे, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, रियाज बागवान आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.