वारणानगर (प्रतिनिधी) : सहकारमहर्षी स्व. विश्वनाथ आण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या पुण्यस्मरणार्थ भारतातील सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध-२०२२ अर्थात कुस्ती महासंग्राम मंगळवार, दि. १३ डिसेंबर रोजी वारणा विद्यालयाच्या क्रीडांगणावर होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मैदानापैकी एक समजले जाणारे ‘वारणा’ कुस्ती मैदान आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्ष मैदान झाले नव्हते; मात्र चालू वर्षी ‘वारणा’ कुस्ती स्पर्धा होत आहे. यावर्षी भारत विरूध्द इराणच्या दिग्गज मल्लांच्या लढती या मैदानात होणार आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभागाने आंतरराष्ट्रीय कुस्तीचा महासंग्राम वारणेत होणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

मॅटवरील कुस्तीपेक्षा भारतीय कुस्तीच्या परंपरेला चालना देण्यासाठी लाल मातीवरील निकाली कुस्त्यांचे मैदान प्रतिवर्षी होत असते. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराणच्या मल्लाच्या लढतीसह २४० हून लहान मोठ्या कुस्त्या होणार आहेत. यामध्ये देशातील हिंदकेसरी, महान भारतकेसरी, महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी, हरीयाणा केसरी असे किताब मिळविलेले देशातील आघाडीचे मल्ल सहभागी होणार असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.