सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब गोस्वामींना मोठा दिलासा   

0
47

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींचा सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला.  प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तत्काळ सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अर्णब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी झाली. अर्णब यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचे कोर्टाने म्हटले आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचेही  कोर्टाने सांगितले.