अर्जेंटिना (वृत्तसंस्था) : आपण बाळाचे बाप झालो असून, आपल्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे, अशी माहिती ८५ वर्षांच्या अल्बर्टो कोर्मिलिएट यांनी दिली आहे. ॲस्टेफनिया फर्टिलिटी ट्रिटमेंटची मदत घेऊन या जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे.

प्रेम करायला वय नसते असे म्हणतात, मात्र आई किंवा बाप होण्याला नैसर्गिक मर्यादा असल्याचे अनेकदा दिसून येते. वाढत्या वयानुसार प्रजननक्षमता कमी होत जाते आणि वयाच्या एका टप्प्यानंतर ती थांबते, असे अनेकदा दिसून आले आहे. आरोग्य सांभाळले आणि फिटनेस टिकवला, तर काय कमाल करता येऊ शकते, याचा वस्तुपाठच अर्जेंटिनातील कोर्मिलिएट यांनी घालून दिला आहे.

अर्जेंटिना येथील अल्बर्टो कोर्मिलिएट यांनी काही वर्षापूर्वी तिशीतल्या तरुणीशी लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे २०१७ साली निधन झाले. त्यानंतर त्यांनी नव्या जोडीदाराची निवड केली होती. वयाच्या या टप्प्यावर आपल्याला मूल असावे, असे त्यांच्या पत्नीला वाटत होते. त्यामुळे दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि तडीस नेला.

आपण या वयातही मुलाचा व्यवस्थित सांभाळ करू शकतो, असा विश्वास अल्बर्टो यांना आहे. अल्बर्टो हे आहारतज्ज्ञ आहेत. याच कलेचा आणि ज्ञानाचा वापर करत त्यांनी आपल्या फिटनेस या वयातही जपला आहे. माणसाच्या जिवंत राहण्याच्या काळावर मर्यादा आहेत; मात्र जितका काळ आपले आयुष्य असेल, तितका काळ आपण बाळासोबत राहू आणि त्याचा सांभाळ करत राहू. आपल्या बाळात त्यांची मोठी भावनिक गुंतवणूक असून, आयुष्यातील उरलेल्या वेळेपैकी बहुतांश वेळ बाळासोबत घालवण्याची आपली इच्छा आहे, असेही अल्बर्टो यांनी सांगितले.