कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात १९ ते २१ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव होणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक आणि खाद्यमहोत्सव, कृषी पर्यटन या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती सुप्रिया करमरकर, उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर), पर्यटन संचालनालय पुणे यांनी दिली.

या महोत्सवात विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार असून बहारदार द्राक्षबागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. या महोत्सवात पर्यटकांना हेरिटेज वॉक अंतर्गत  पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्यात येईल. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या प्रसिद्ध शिवनेरी किल्ल्याची सफर २० फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. जुन्नर येथील देवराईंमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येईल. त्यानंतर कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेट दिली जाईल. इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद  घेऊ शकतात आणि वाईन कशी बनते याची प्रक्रिया  पाहून ती वाईन खरेदी करू शकतात. आमच्याकडे बेदाणे, मनुके आणि द्राक्षांचा ताजा रस यांचा तुम्ही मधुर आस्वाद घेऊ शकता. त्याचसोबत वेलीला लगडलेली द्राक्ष काढून तुम्ही ती विकत घेऊ शकता,

शेवटच्या दिवशी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले  आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गिब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी, ताम्हाणे संग्रहालय, लेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल.