मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल.

औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होईल. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकावल्यामुळे विधानपरिषदेत भाजपचं वजन वाढलं आहे. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असल्याने पुन्हा समीकरण बदललं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत – ६ ते १२ नोव्हेंबर, अर्जांची छाननी – १३ नोव्हेंबर, अर्ज माघारीची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर, मतदान – १ डिसेंबर, निकाल – ३ डिसेंबर