महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होणार मुख्यमंत्री..?  

0
84

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरोधात भाजप आमदारांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी कोश्यारी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

उत्तराखंडचे आमदार आणि मंत्री दिल्लीला गेलेले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील दिल्लीत तळ ठोकून आहेत. रावत यांना पक्षनेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितले आहे. परंतु या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. रावत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली आहे.  तर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  दोन दिवसापूर्वी पक्ष नेतृत्वाने रमणसिंग आणि दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडच्या दौऱ्यावर पाठवले होते. त्यांनी ४५ आमदारांशी चर्चा करून आपला अहवाल राष्ट्रीय कार्यकारणीकडे पाठवला आहे. त्यानंतर आज गृहमंत्री अमित शहा  हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यापूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे आता त्यांची पुन्हा मुख्यमंत्री पदावर निवड होण्याची शक्यता आहे.