मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे आधीच वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. जवानांना श्रद्धांजली वाहताना मात्र राज्यपालांनी त्यांची चप्पल काढली नाही. राज्यपालांनी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणे हा  हुतात्म्यांचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावत यांनी एक व्हिडिओ ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली वाहिली.

“अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. राज्यपाल चप्पल न काढताच अभिवादन करत असतानाचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे.