राशिवडे (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील लालबावटा बांधकाम कामगार संघटनेने संघर्ष करून २४ प्रकारच्या योजना पदरात पाडून घेतल्या आहेत.  संघटना आपल्या मागे लागण्याची वाट पाहू नका.  कामगारांचा अंत पाहू नका, आमच्या मागण्यांची वेळीच दखल घ्या,  असे आवाहन लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले.

ते आवळी बुद्रुक येथे  झालेल्या बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव कवडे होते. संघटना आणि संजीवन ब्लड बॅंक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५६ बांधकाम कामगारांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

कांबळे  पुढे  म्हणाले की, कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित कल्याणकारी मंडळाने पाठवलेला प्रस्ताव का मंजूर होत नाही ?,  निवडणुकांच्या तोंडावर  श्रेय घेण्यासाठी मागण्या प्रलंबित ठेवल्यात का?  मागण्या मान्य करा, अन्यथा आतापर्यंत सोबत असणाऱ्या आमच्या या संघटनेच्या कामगारांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल,  असा इशारा दिला.

संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम म्हणाले की, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ११ हजार कोटी रुपये शिल्लक असताना आम्हाला आमच्या मागण्यांसाठी मोर्चे काढावे लागत आहेत.  सरकार देत असलेल्या योजना या शिल्लक असलेल्या पैशाच्या व्याजाइतकी रक्कमही देत नाही.

जिल्हा उपाध्यक्ष व राधानगरी तालुकाध्यक्ष संदीप सुतार यांनी १८ ऑक्टोबरच्या मोर्चासाठी राधानगरी तालुक्यातून १० हजारपेक्षा अधिक बांधकाम कामगार सहभागी होणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रा. आनंदराव कवडे,  नितीन घोरपडे, प्रकाश कुंभार, भगवान घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वास आरडे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी कांबळे, अशोक सुतार, कृष्णात सुतार, संदीप यादव, बळवंत सुतार, जयवंत सुतार, सुरेश ढेरे,  नामदेव पोवार, डॉ. एल. बी. सातपूते, सचिन कवडे आदीसह बांधकाम कामगार उपस्थित होते.