पाँडिचेरी : ‘ज्याप्रमाणे मोबाईल मधल्या ठरावीक व्यतिरिक्त इतर सुविधा आपल्याला माहिती नसतात किंवा त्याचा वापर आपल्याकडून होत नाही. त्याच प्रकारे शासनाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्या आपल्याला माहिती नाहीत आणि जसा आपल्याकडून वापर होत नाही. तेव्हा अशा योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य प्रकारे विनिमय करावा आणि संशोधन क्षेत्रात पुढे जावे’ असे प्रतिपादन पाँडिचेरी विद्यापीठाच्या मुख्य रेक्टर आणि लेफ्टनंट राज्यपाल डॉ. तामिलीसाई सौंदराराजन यांनी केले.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय प्रायोजित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि पाँडिचेरी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुति प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. मुख्य अतिथी म्हणून स्तुतीचे समन्वयक शिवाजी विद्यापीठाचे प्रा. आर. जी. सोनकवडे उपस्थित होते.

स्तुति कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक भारतभर वाढत आहे. कोल्हापूर आता अगदी काश्मीरपासून वेल्लोरपर्यंत पोहोचले आहे. जोधपूरच्या आयआयटीसारख्या संस्थेमध्ये आणि लखनऊच्या बाबासाहेब आंबेडकर या केंद्रीय विद्यापीठापर्यंत पोहोचून स्वतःचे साम्राज्य व आपले अभिमानास्पद विद्यापीठ यांचा परिचय करून देत आहे. गोवा आणि केरळनंतर आता पुन्हा पाँडिचेरी केंद्रीय विद्यापीठात हा नववा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिवाजी विद्यापीठातर्फे होणाऱ्या स्तुती कार्यक्रमांपैकी प्रथमच एका केंद्रशासित प्रदेशामध्ये हा कार्यक्रम होत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सात दिवस विविध प्राध्यापक मंडळी अतिशय प्रगतशील उपकरणावर तांत्रिक बाबीची माहिती सर्वांना देणार आहेत. स्तुति प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी, पाँडीचेरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गुरमीत सिंग, स्थानिक स्तुति समन्वयक, पाँडीचेरी विद्यापीठाच्या सीआयएफ सेंटरचे सध्याचे प्रमुख प्रा. शिवशंकर आणि माजी प्रमुख प्रा. बाला मणिमरन आदी उपस्थित होते.

पाँडिचेरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गुरमीत सिंग यांनी स्तुति प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची ही संधी पाँडीचेरी विद्यापीठाला मिळवून दिल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ आणि प्रा. सोनकवडे यांचे आभार मानले. स्तुतिचे समन्वयक प्रा. राजेंद्र सोनकवडे यांनी, औद्योगिक क्षेत्राला या अत्याधुनिक उपकरणाची कशाप्रकारे उपयुक्त होईल यावर मार्गदर्शन केले. आता संशोधक प्राध्यापक आणि उद्योजकांनी एकत्र येऊन मेक इन इंडियामध्ये सहभागी व्हावे आणि अशी अत्याधुनिक साधने विकसित करण्याचा प्रयत्न करावा, असे मत प्रा. सोनकवडे यांनी व्यक्त केले.