जयपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना आता ॲडव्हान्स सॅलरी देण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगार होण्यापूर्वीच अॅडव्हान्स सॅलरी मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याच्या आधीच अॅडव्हान्स सॅलरी देणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या बरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय घेतला आहे.
राजस्थान सरकारच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ही सुविधा एक जूनपासून लागू करण्यात आली आहे. 20 हजार रुपयांपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स सॅलरी मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनातील काही रक्कम ॲडव्हान्स सॅलरी म्हणून घेतली, तर त्यांच्या पगारातून त्यांनी घेतलेली रक्कम वजा करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या ॲडव्हान्स सॅलरीसाठी कोणत्याही प्रकारचे व्याजदर आकारले जाणार नाही. या सुविधेचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. राजस्थान सरकारने घेतलेला हा निर्णय आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याची टीकाही आता विरोधक करत आहेत.