कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशात कोरोना पुन्हा वाढत आहे. त्यामुळे अलर्ट राहा आणि मास्कचा वापर करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच सॅनिटायजेशन आणि सोशल डिस्टंसिंगबाबत सरकारी यंत्रणांनी कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. ते कागलमध्ये कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोरोना लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे फ्रन्टलाईनवर काम केलेल्या कोरोनायोध्द्यांनी   तातडीने लसीकरण करून घ्यावे. ते पूर्ण झाल्यानंतर मगच पन्नास वर्षावरील नागरिकांना लस मिळणे सोपे होणार आहे. राज्याच्या तुलनेत या घडीला जरी कागल तालुक्यात रुग्णसंख्या कमी असली तरी कोव्हिड सेंटर, औषध पुरवठा आणि अनुषंगिक यंत्रसामुग्री सज्ज ठेवा अशा सूचनाही ना. मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यात्रा, जत्रा, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम शासनाच्या सूचनेनुसार मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच करा, असे आवाहनही ना. मुश्रीफ यांनी केले.

या बैठकीला तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे आदी अधिकारी उपस्थित होते.