गडहिंग्लज (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षानिमित्य २५ जूनपासून कृषी विभागामार्फत घेण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाला नेसरीसह परिसरातील सांबरे, अर्जुनवाडी, हडलगे, तावरेवाडी, सरोळी, हेळेवाडी आदी गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

गडहिंग्लजच्या उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री फलाटे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रातील विविध विषयावर कार्यशाळा घेतल्या जात आहेत. या सप्ताहात कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. १ जुलै रोजी कृषिदिनाच्या औचित्याने गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन महागावचे मंडल कृषी अधिकारी हरिदास बोंगे, कृषी पर्यवेक्षक विकास जोशीलकर, कृषी सहायक सचिन नाईक, नंदकिशोर दुनगाहू, राजाराम आजगेकर, समाधान काशीद आदी करीत आहेत.