रायगड (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मागील ७ ते ८ महिने संपूर्ण देशात मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यत आली आहेत. पण हळूहळू कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने उद्योग-व्यवसाय सुरू होत आहेत. त्यातच दिवाळीत शिवप्रेमींसाठी खुशखबर आहे. रायगड किल्ला आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.

रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे. असे असले तरी  येणाऱ्या पर्यटकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकच्या काळात रायगड पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत.  मागील ८ महिन्‍यांपासून कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्‍हता. ही ठिकाणे खुली करावीत अशी मागणी विविध संस्‍था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती. रायगड जिल्‍हयातील सर्व गडकिल्‍ले आणि पर्यटन स्‍थळे तसेच स्‍मारके खुली करण्‍यात आदेश रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत.

जिल्‍हाधिकारी यांच्‍या आदेशामुळे रायगड किल्‍ल्‍याबरोबरच चवदार तळे व इतर गडकिल्‍ले या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. शिवाय त्‍यावर आधारीत रोजगार पुन्‍हा सुरू होणार आहेत. मात्र हे करताना कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग, मास्‍क वापरणे आरोग्‍य विभागाने ठरवून दिलेल्‍या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.