नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात येणाऱ्या कोविशिल्डया कोरोना प्रतिबंधक लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. आज (शुक्रवार) भारताचे औषध महानियंत्रक कार्यालयातील अधिकारी आणि कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. भारतात लसीला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाला लवकरच सुरुवात होईल.

भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय आणि केंद्र सरकारच्या तज्ज्ञगटाची आज महत्त्वाची बैठक होती. त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम कंपनीने आधीच लसीचे सुमारे ५ कोटी डोस तयार करून ठेवले आहेत. जगभरात अमेरिकेनंतर सर्वांत जास्त कोरोना बाधित भारतात आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. लसीला मान्यता मिळाली असून तिची साठवणूक कशी होणार, वाहतूक सुविधा, कोल्ड स्टोअरेज (शीतगृहात लस ठेवण्याची सुविधा), सर्वात आधी लसीकरण कोणाचे होणार हे एक मोठे आव्हान सरकारपुढे आहे. मागील काही महिन्यांपासून आरोग्य मंत्रालय आणि संबधितत विभागांनी संसाधनांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

कोविशिल्ड ही लस सीरम कंपनी पुणे येथील प्रयोगशाळेत तयार करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीशी सीरमने सहकार्य केले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून भारतातील चाचणीचा खर्च उचलण्यात येत आहे. तर सीरमकडून लसनिर्मितीसाठी लागणारा इतर खर्च करण्यात येत आहे. लसीचे काही प्रमाणात डोसची निर्मितीही करण्यात आली आहे. कंपनीने आत्तापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या प्रगतीपथावर आहेत. कोरोना लस पूर्णपणे तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने लसीचे उत्पादन करण्यात येईल त्यासाठीची तयारीही सुरू आहे.