अच्छे दिन स्वप्नवतच..? ; महागाई जगण्याच्या मुळावर…

0
245

कोल्हापूर (भीमगोंड देसाई) : घरगुती गॅस आणि पेट्रोल, डिझेलचे भरमसाठ भाव वाढल्याने महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामुळे सामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी त्यांच्या आयुष्यातील अच्छे दिन स्वप्नवतच राहिले आहेत. आर्थिक समस्येमुळे काहीजण आत्महत्तेसारखे टोकाचे पाऊलही उचलत असल्याचे समोर येत आहे. यामुळे ही वाढती महागाई जगण्याच्या मुळावरच उठल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

आठवडाभरात पेट्रोलने ९० पार केली आहे. डिझेलचेही दर ८० च्यावर गेले आहेत. घरगुती गॅसचा दर महिन्यात १०० रूपयांनी वाढून सातशे रूपये झाला आहे. कडधान्यांच्या दराने शंभरी गाठली आहे. गहू, तांदूळ, खाद्य तेलांचे देखील दर वाढले आहेत. यामुळे श्रीमंत वगळता इतर घटकातील कुटुंबांची प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे. लॉकडाऊन, कोरानामुळे पैशाचे स्त्रोत कमी झाले आहेत. आणि त्यातच अनेक खासगी कंपन्यांनी पगारात कपात केली आहे.

उद्योग, व्यवसायात मंदी आहे. अशा स्थितीमध्ये महागाई गगनाला भिडत असल्याने सामान्यांचे जगणचे कठीण झाले आहे. हातावर पोट असणारे अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. त्यांची दोन वेळची चूल पेटणे अडचणीचे झाले आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून शहरात भीक मागणाऱ्यांची संख्या अधिक दिसत आहे. प्रार्थनास्थळे, सिग्नल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर लहान मुलांना काखेत घेऊन भीक मागणाऱ्या महिला लक्षणीय प्रमाणात दिसत आहेत. छोटी मुलेही हातात ताट घेऊन दुपारच्या उन्हात हात पसरत फिरत आहेत. अशाप्रकारे महागाईने कहर केल्याने जगणंच असह्य झाल्याचे पाहायला मिळत आहे.