कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडे येणारे विविध टेंडर्स (निविदा) थेट संचालक मंडळासमोर न उघडता आधी संबंधित अधिकाऱ्यांसमोर उघडले जातात. त्या निविदांमध्ये दिलेल्या प्रस्तावांची यादी बनवून ती संचालक मंडळासमोर सादर केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणी गोकुळच्या संचालीका शौमिका महाडिक यांनी केली आहे.

शौमिका महाडिक म्हणाल्या की, गोकुळ संघाकडे ज्या काही निविदा येतील ते परस्पर न उघडता संचालक मंडळाच्या उपस्थितीतच उघडले जावेत. पुढील संपूर्ण प्रक्रिया संचालक मंडळाच्या उपस्थितीतच पार पाडावी. जेणेकरून या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येईल व विश्वासार्हतेला कसलीही बाधा पोहोचणार नाही. आधीच्या काळामध्ये आलेल्या निविदांची यादी बनवली जात होती. त्यापैकी ज्यांचा प्रस्ताव संघासाठी किफायतशीर असेल त्यांच्याशी चर्चा करून प्रस्तावाला मान्यता दिली जायची. जेणेकरून संघाचे पर्यायाने सर्वसामान्य दूध उत्पादकांचे पैसे एखाद्याला जास्तीचा फायदा मिळवून देण्याच्या हेतूने नाहक खर्च होऊ नयेत. पण अलीकडच्या काळात या प्रक्रियेत बदल करून आपण निर्णय घेतला आणि प्रस्ताव मान्यतेचे अतिरिक्त अधिकार स्वतःच्या अखत्यारीत ठेवले आहेत.

हे अधिकार आपल्याकडे घेताना जी काही कारणे दिली गेली त्यामध्ये काही तथ्य नाही असे माझे मत आहे.  तुम्ही जी शक्यता वर्तवली की, कमी दरात सेवा पुरवणारे पुरवठादार योग्य पद्धतीने सेवा पुरवत नाहीत व कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांनी  सेवा खंडित केली तर त्याचे नुकसान संघाला सोसावे लागणार आहे. या शक्यतेला कसलाही वैचारिक आधार  नाही. कारण प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्या पुरवठादारांकडून संघाकडे रीतसर अनामत रक्कम जमा करून घेतली जाते आणि म्हणूनच याआधी असे वाईट अनुभव संघाला सहसा कधी आले नाहीत. तरीही जर दुर्दैवाने असा प्रकार घडलाच तर ती अनामत रक्कम जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकारही संघाकडे आहेत. त्यामुळे आपण आता घेतलेल्या या नव्या निर्णयामागे स्पष्ट राजकीय हेतू दिसून येतो.

इतक्या वर्षांमध्ये संघाने जी विश्वासार्हता कमावली त्याला तडा जाताना पाहायला मिळत आहे. एकवेळ संघाचे हित जोपासले नाही तरी चालेल, विश्वासार्हता गेली तरी चालेल, जास्तीचे पैसे गेले तरीही चालतील पण आमच्या माणसांचेच प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत. काही करून त्यांना आर्थिक फायदा मिळालाच पाहिजे अश्या पद्धतीची आपली भूमिका दिसते आहे. ही गोष्ट सर्वांसाठीच खेदजनक बाब आहे. भविष्यात जर गोकुळ दूध संघामध्ये फक्त चेअरमन सांगतील त्यांचा प्रस्ताव मान्य होतो अशी भावना पुरवठादारांमध्ये निर्माण झाली, तर यामुळे जी सहकारी तत्वे व संघाचे हित धुळीला मिळेल त्यासाठी सर्वस्वी आपण जबाबदार राहणार आहात.

आपण कोणाच्यातरी सांगण्यावरून हे पाप स्वतःच्या माथ्यावर ओढून न घेता आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व संपूर्ण प्रक्रिया पूर्वरत सुरु ठेवावी. वरील दोन्ही मागण्यांचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि यासंबंधित सकारात्मक निर्णय घेऊन नावाप्रमाणेच दूध उत्पादकांचा ‘विश्वास’ अबाधित राखाल, इतकीच अपेक्षा करत असल्याचे संचालिका शौमिका महाडिक यांनी म्हटले आहे.