कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळप्रमाणेच सहकार तत्त्वावर चालत असलेल्या महानंद दूध संघाचा आर्थिक पाया आणखी भक्कम करण्यासाठी गोकुळ संघाने सहकार्य केले आहे. गोकुळ संघाची मुंबई शहरातील दूध विक्री प्रतिदिन सुमारे ७ लाख लिटरपेक्षा जास्त आहे. संघाच्या वाशी येथील डेअरीतील ३ लाख लिटर दुधाच्या पॅकिंगचे काम खाजगी कंपनीऐवजी आता ‘महानंद’ला देण्यात आले आहे. याचा लाभ ‘महानंद’ला होणार आहे, तसेच खर्चात बचत होणार असल्याने गोकुळ दूध संघालाही याचा फायदा होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

गोकुळ संघाच्या वाशी येथील डेअरीमधून प्रतिदिन ५ लाख लिटर दुधाचे पॅकिंग होते व ३ लाख लिटर पॅकिंग हे इग्लू डेअरी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीकडून सध्‍या प्रती लिटर १ रुपये ६० पैसे या दराने पॅकिंग करून घेतले जात होते. कराराची मुदत ३१ मे रोजी संपली. करार नूतनीकरण करण्‍यासाठी कंपनीने ९ टक्‍के (प्रतिलिटर ०.१४ पैसे) दरवाढीची मागणी केली होती. ही दरवाढ अवास्‍तव असल्‍याने संघाने याला नकार दर्शवला. ना. मुश्रीफ आणि ना. पाटील यांनी ‘महानंद’ या महासंघास  आर्थिकदृष्‍टया भक्कम करण्यासाठी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) व ‘महानंद’चे चेअरमन रणजित देशमुख यांच्याबरोबर चर्चा करून दोन्ही संघांंना परस्‍पर सहकार्य करण्‍याचा सल्‍ला दिला.

त्‍याप्रमाणे ‘महानंद’च्या गोरेगाव या दुग्धशाळेत गोकुळचे दूध प्रती लिटर १ रुपये ५५ पैसे या दराने पॅकिंग करून घेण्‍याचा ठराव एकमताने झाला. यामुळे गोकुळ दूध संघाचे प्रति लिटर १४ पैसे बचत होऊन वार्षिक १ कोटी ५५ लाखांची बचत होणार आहे. आज (गुरुवार) दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्‍या दालनामध्‍ये सदर करारपत्रावर स्वाक्षरी झाल्‍या. या वेळी तिन्ही मंत्र्यांसह चेअरमन विश्‍वास पाटील, ‘महानंद’चे चेअरमन रणजित देशमुख, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, ‘महानंद’चे व्‍हा. चेअरमन डी. के. पाटील, महानंदाचे कार्यकारी संचालक श्‍याम सुंदर पाटील, गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर तसेच अधिकारी उपस्थित होते.