कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ प्रकल्‍प येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन या कंपनीचा पेट्रोल व डिझेल पंप मंजूर झाला आहे. मंजुरीचे पत्र बीपीसीएलचे गोवा मॅनेजर अभिजीत पानारी यांनी संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील यांच्याकडे संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालयामध्‍ये आज (शनिवार) सुपूर्द केले.

यावेळी चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले की, गोकुळ दूध संघाची अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी पेट्रोल पंपाची मागणी पुर्णत्‍वास आली आहे. या पंपाची उभारणी गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील संघाच्‍या जागेत हायवेकडील बाजूस करण्यात येणार आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळणार असून पेट्रोल पंप ग्राहकांच्‍या पसंतीस पडेल. पंपाचा लाभ गोकुळ संलग्‍न दूध वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना तसेच संघाचे कर्मचारी व नागरिकांना होणार आहे. या पंपाच्‍या मंजुरीसाठी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, बाबासाहेब चौगले, बाळासो खाडे, बीपीसीएलचे गोवा मॅनेजर अभिजीत पानारी, अधिकारी संतोष साहणी, नानासाहेब सुगावकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.