गोकुळची सभा ऑनलाईन काही सभासदांना अनम्युट करुन घेतली : शौमिका महाडिक

0
158

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज गोकुळ दुध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कोरोनाची दुसरी लाट असतानाही प्रचार ऑफलाईन करून निवडणूकीचा हट्ट धरणाऱ्यानी संघाची सर्वसाधारण सभा मात्र कोरोनाचे कारण सांगून ऑनलाईन घेतली. कोटयावधींची उलाढाल असलेल्या दुध संघाचे महत्वपूर्ण निर्णय मंजूर करून घेण्याची प्रक्रिया कदाचीत मंत्र्यांच्या सुचनेनुसार कार्यकारी संचालकांचे वाचन, चेअरमन साहेबांची विचारणा व दोन-चार सभासदांना अनम्युट ठेवून पार पाडली गेली असल्याचे संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले.

शौमिका महाडिक म्हणाल्या की, नवीन प्रकल्पांसाठी जागा खरेदीसाठी जी 130 कोटींची रक्कम संघाकडून अदा करण्यात येणार होती, ती रक्कम सुध्दा कर्ज स्वरूपात देण्याची तयारी एनडीडीबीने दाखवली आहे अशी माहिती आज सभेत देण्यात आली. त्यासोबत हेही सांगीतलं गेलं की गोकुळ दुध संघाचा एकंदरीत कारभार, इतक्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता हे कर्ज देण्यास काही अडचण नाही असा प्रतिसाद एनडीडीबीने दिला. हे समजल्यानंतर खरंतर हा प्रतिसाद आणि यांना मिळणार असलेले कर्ज ही मागील सत्ताधाऱ्यांचीच पुण्याई आहे असं म्हणायला हरकत नाही.

कालच्या आमच्या पत्रकार परिषदेनंतर शेकडो कोटी रूपये एकत्रीत खर्च करण्याचा निर्णय बदलून टप्या-टप्याने खर्चाचा प्रस्ताव आज मांडला गेला. हा आमच्या लढयाचा विजय आहे. पण तरीही एवढयावर न थांबता या सर्व खरेदी प्रकरणात जिथे गोंधळ वाटेल तिथे आम्ही नक्की प्रश्न उपस्थित करू व सत्ताधाऱ्यांना स्पष्टीकरण देण्यास भाग पाडू.

आज चेअरमन साहेब म्हणाले, ‘मी भाकरी थापली, परतली आणि इथून पुढं करपणार नाही याची काळजी घेईन.’  हे सगळं  ऐकल्यानंतर मनोमन असं वाटून गेलं की, एवढया ‘कर्तृत्ववान’ माणसावरही एखादी डॉक्युमेंटरी असली पाहिजे आणि यांचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांना समजला पाहिजे ! यासाठी मी नक्की वेळ काढून पुढाकार घेईन.

जिथे संचालिका असून मी विचारलेल्या प्रश्नांना आणि माझ्या पत्रांना महिनोमहिने उत्तर मिळत नाही, तिथे सर्वसाधारण दुध उत्पादक काय प्रश्न विचारणार ?. त्यांचे प्रश्न संचालकांपर्यंत पोहचणार का ? पोहचले तरी त्याला उत्तर मिळणार का ? आयत्यावेळी जर प्रश्न विचारायचे असले तर त्यांना अनम्युट केलं जाणार का ?  असे अनेक प्रश्न माझ्यासमोर आधीच होते, त्यामुळे  आज काही फारसा विरोध होईल किंवा नोंदवला जाईल अशी अपेक्षा नव्हतीच.

आता पुढच्या वर्षी सभा प्रत्यक्षात ऑफलाईन घेण्यासंदर्भात चेअरमननी दिलेला शब्दतरी ते पाळतील परंतु, हे वक्तव्यही निवडणूकीच्या आश्वासनांप्रमाणे हवेत विरून जाऊ नये आणि मागील चार-पाच महिन्यात मी पत्राद्वारे विचारलेल्या प्रश्नांना ते लवकरात लवकर लेखी उत्तर देतील अशी अपेक्षा करत असल्याचे शौमिका महाडिक म्हणाल्या.