कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) : पारंप‍रिक गुणवत्‍तेला आधुनिकतेची जोड देत गोकुळचे ‘सिलेक्‍ट’ ट्रेट्रापॅक दूध आजपासून  (बुधवार)  गुजरामधील हिंम्‍मतनगर व अहमदाबाद येथील रिलायन्‍स मॉलमध्‍ये विक्रीस उपलब्‍ध झाले आहे. ग्राहकांनी सुद्धा खरेदीस प्राधान्‍य देत गोकुळला पसंती दिली आहे. गोकुळ दूधाची गुणवत्‍ता व स्‍वाद अखेर गुजरातमध्‍ये पोहोचला आहे.

बाजारपेठेतील अमुलच्‍या वर्चस्‍वाला शह देत गोकुळने आपाली नेहमीची बाजारपेठ स्थिर ठेवत गुजरातमध्‍ये प्रवेश केला आहे. कोल्‍हापूरच्‍या कसदार मातीतील सकस हिरव्‍या वैरणीबरोबर महालक्ष्‍मी पशुखाद्याचे विविध प्रकार जनावराच्‍या आहारात असल्याने गोकुळच्‍या दुधाला एक वेगळा स्‍वाद व गुणवत्‍ता आहे. महाराष्‍ट्रातील मुंबई, पुणे, रत्‍नागिरी, सांगलीबरोबर गोव्‍यातील ग्राहकसुद्धा गोकुळच्‍या दुधाला प्राधान्‍य देतात.

यासंदर्भात माहिती देताना गोकुळ चेअरमन रविंद्र आपटे म्‍हणाले की,  अतिरिक्‍त दूधाचे रूपांतर करण्‍यासाठी होणाऱ्या खर्चास व त्‍यातून होणारा तोटा कमी करण्‍यासाठी जास्‍तीत-जास्‍त बाजारपेठा काबीज करणे गरजेचे आहे. तसेच काही कालावधीतच भारतातील प्रमुख शहरामध्‍ये गोकुळ दूध उपलब्‍ध करून दि‍ले जाईल. याचे सर्व श्रेय दूध उत्‍पादक शेतकरी,  दूध संस्‍था, वितरक  व कर्मचारी यांचे असेल,   असेही ते म्‍हणाले.