कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर १४ ऑक्टोबररोजी जमा करणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.

संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दर फरक दिला जातो. यावर्षी संघाने म्हैस दुधाकरीता ४९ कोटी ५३ लाख २ हजार रुपये, तर गाय दुधाकरीता २१ कोटी ५० लाख १८ हजार रुपये इतका दूध दर फरक आणि त्यावरील ६ टक्केप्रमाणे होणारे व्याज २ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपये जमा केले जाणार आहे.

त्याचबरोबर डिबेंचर्स ६.५० टक्के प्रमाणे व्याज ४ कोटी ५७ लाख ८९ हजार रुपये व शेअर्स भांडवलवर ११ टक्के प्रमाणे डिव्हीडंड ५ कोटी ३३ लाख ६५ हजार रुपये असे एकूण ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्क्म दूध बिलातून दूध  संस्थांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

गोकुळने दूध उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना व विकास प्रकल्प राबविलेले आहेत. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले.