‘गोकुळ’ कोणाकडे ? : उद्या निकाल, जिल्ह्यात उत्सुकता शिगेला….

0
450

कोल्हापूर / धामोड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’साठी काल (रविवार) मतदान पार पडले. सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी आणि विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यात अनेक आरोप- प्रत्यारोप करत मागील महिनाभर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. संघ स्थापनेपासून ते आजपर्यंत कधी नव्हे इतकी ईर्षा या निवडणुकीत पहायला मिळाली. सुमारे १०० टक्के मतदान झाले. आता उद्या जाहीर होणाऱ्या निकालाची उत्सुकता केवळ जिल्हावासीयांनाच नव्हे, पश्चिम महाराष्ट्राला लागली आहे.

गोकुळ संघाला जिल्ह्याची अर्थवाहिनी मानले जाते. अर्थात लहान सहान वाड्या-वस्तीत विखुरलेल्या या जिल्ह्यात छोट्या मोठ्या दूध संस्थांच्या माध्यमातून सर्वत्र गोकुळने आपले जाळे निर्माण केले आहे. या जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय शेती असल्याने येथील शेतकरी पशुपालन क्षेत्रात आपोआपच ओढला गेला. अर्थात ‘गोकुळ’मुळे शेतकऱ्याला दूध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून करता आला. गोकुळमुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणूनच जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांची नाळ या संस्थेशी जोडली गेली आणि यातूनच प्रत्येकाच्या मनात ‘आपलं गोकुळ’ही भावना द्रुढ झाली.

१९६३ साली कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या संघाचे संपूर्ण जिल्ह्याचे पहिल्या दिवसाचे दूध संकलन साडेतीनशे लिटर होते. आज ते साडेतेरा लाखांवर गेले आहे. यामागे अनेकांचे कष्ट, त्याग, मेहनत कारणीभूत आहे. संघ स्थापनेपासून ते १९९० पर्यंत आनंदराव पाटील-चुयेकर  आणि विद्यमान संचालक अरुण नरके यांचाच शब्द येथे प्रमाण मानला जायचा. १९९० नंतर आ. पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली संघाचा कारभार सुरू झाला आणि तो आजपर्यंत कायम आहे.

या दूध संघाच्या माध्यमातून सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आजपर्यंत अनेक योजना या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आल्या. पण विद्यमान नेत्यांना ‘मल्टिस्टेट’ हा मुद्दा सर्वांना विश्वासात घेऊन  समजावून सांगता आला नाही. येथूनच पुढे गोकुळसाठी इर्षेचे राजकारण सुरू झाले. पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ इतिहासात प्रथमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक प्रबळ गट उभा ठाकला.

कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय गोदामात उद्या सकाळी ८ वा. मतमोजणीस सुरुवात होणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी विजयी मिरवणुकीसह रॅली काढण्यावर, जल्लोष करण्यावर बंदी घातली आहे. साधारण साडेअकराच्या सुमारास संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी गटाने पुन्हा सत्तेत राहण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी गटाला हरवायचेच या हेतूने विरोधी गटाने केलेली व्यूहरचना यामध्ये कोण सफल होणार त्यावेळीच समजणार आहे.