कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश आज (बुधवार) प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले. ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे, तिथून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या ठराव संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निवडणुकीसाठीची प्रारुप यादी प्रसिद्ध होईल. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीही उर्वरित ठराव संकलन प्रक्रिया सोमवारपासून सुरु होणार आहे.

गिरी यांच्या या आदेशामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला गती येणार आहे. जिल्हा बँकेची ठराव प्रक्रिया पाच दिवस शिल्लक होती, तोपर्यंतच निवडणुकीला स्थगिती आल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. आता उर्वरित प्रक्रिया (सोमवार) १५ फेब्रुवारीपासून सुरू होत असून पाच दिवसात उर्वरित संस्थांचे ठराव दाखल करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्याने निवडणुकीसाठीची तारीख बदलावी यासाठी काही संस्थांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली, याबाबत प्राधिकरणाला निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राधिकरणाने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध संबंधित संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.