कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निकालाचे कल पाहता सत्तांतर होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण गटासाठीच्या १६ जागांसाठी मतमोजणी सुरू असून दुसऱ्या फेरीअखेर विरोधी आघाडीतील ९ उमेदवार तर सत्ताधारी गटाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. महिला राखीव, अनुसूचित जाती / जमाती गट, भटक्या विमुक्त जाती /जमाती गट आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एकूण ५ जागांपैकी ४ जागा जिंकून विरोधी आघाडीने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे.

महिला राखीव, अनुसूचित जाती / जमाती गट, भटक्या विमुक्त जाती /जमाती गट आणि इतर मागासवर्गीय गटाचे निकाल दुपारीच जाहीर झाले. या पाचपैकी महिला राखीव गटातील सत्ताधारी गटाच्या उमेदवार शौमिका महाडिक यांचा अपवाद वगळता इतर सर्व ४ जागांवर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये अंजना रेडेकर, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील आणि बयाजी शेळके यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण गटातील एकूण १६ जागांसाठी ३३ उमेदवारांनी निवडणूक लढवली. दुसऱ्या फेरीअखेर विरोधी गटाचे ९ उमेदवार आघाडीवर आहेत.